पुणे । बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याची चर्चा असली तरी उपनगरांमध्ये मात्र, बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. ही बांधकामे रोखण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. शहरालगतच्या उपनगरांमधील बांधकामांचा दर पंधरा दिवसांनी अहवाल देण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने बांधकाम विभागाला दिला आहे. परवानगीपेक्षा अधिक बांधकामे करीत असलेल्या मिळकतधारकांना नोटिसा बजाविल्या आहेत का, याची माहितीही कार्यकारी अभियंत्यांकडून मागविण्यात आली आहे. धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, हडपसर, वारजे-माळवाडी भागातील बांधकामवर पहिल्या टप्प्यात नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या भागात सुरू असलेल्या बांधकामांची सविस्तर माहिती गोळा करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
कारवाईचा बडगा उगारणार
उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बांधकामे सुरू झाली आहेत. मात्र, त्यात बेकायदा बांधकामांचे प्रमाण अधिक असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच, घरे घेणार्या नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना उघडकीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामांची बाब प्रशासनाने गंभीर घेतली असून, कारवाईसाठी पावले उचलली आहेत. बांधकामांची तपासणी करून अहवाल देण्याचा आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी बांधकाम खात्याला केली आहे. त्यानुसार या खात्यातील कार्यकारी अभियंत्यांकडील माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल मांडला जाणार आहे.