चाकण । न्यायालयाच्या आदेशानुसार, महामार्गावर मद्यविक्रीस बंदी आहे. परंतु, चाकण परिसरात ठिकठिकाणी बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी एकच्या सुमारास बेकायदा मद्य विक्री करणार्या एकास चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हवालदार अनिल जगताप, पोलीस नाईक अजय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपी सलमान यामिन मलिक हा बेकायदा मद्य विक्री करताना सापडला. त्याच्याकडून 936 रुपये किंमतीच्या 18 मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलीस नाईक अजय भापकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.