बेकायदा वाहन पार्किंग धारकांवर कारवाई

0

नवी मुंबई । पुढच्या महिन्यात नेरूळ मधील डी. वाय. पाटील स्टेडीयमवर फिफा वर्ल्ड कपचे काही सामने होणार असल्याने स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून मनपाने कठोर पावले उचलले आहेत. अनेक सेवा सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरु असून त्याच वेळी वाहन पार्किंगच्या मुद्यावरही प्रशासन आक्रमक झाली आहे. पामबीच मार्गावरील बेकायदा दुकाने आणि पार्किंगवर पालिका व वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत दोन लाख रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. रविवारी या कारवाईला काही काळासाठी विराम देण्यात आल्यानंतर या मार्गावर बेकायदा पार्किंग करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून ही कारवाई नव्याने सुरू करण्यात आली.

पामबीच मार्गावरील अरेंजा कॉर्नर ते कोपरीपर्यंत सतरा प्लाझा आणि इतर ठिकाणी बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. आजवर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने व्यावसायिकांना नोटिसा पाठवून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पामबीच मार्गावरील बेकायदा पार्किंग हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या विभागात कारवाईचा धडाका सातत्याने सुरू आहे.

पामबीच मार्गाच्या दिशेने चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीची कामे चालतात. याशिवाय वाहनांच्या विविध सुटया भागांची विक्रीही केली जाते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. कोपरी गाव ते एमएसईबी चौकापर्यंत बेकायदा पार्किंगमुळे दोन मार्गिका अडवून ठेवल्या जातात. त्यामुळे या परिसरात सातत्याने अपघात होत होते. पालिकेने नोटीस बजावून कारवाई होत नसल्याने नागरिक वारंवार पालिका आणि वाहतूक विभागाकडे तक्रारी करीत होत्या. त्यामुळे पालिका आयुक्त रामास्वामी यांच्या आदेशाने बेकायदा पार्किंगवर दंड वसूल करण्यात आला. व्यावसायिकांना नोटीस बजावल्यानंतर यातील काही व्यावसायिकांनी स्थगिती मिळवली आहे.

मूळ आराखडे तपासणी सुरू
सतरा प्लाझामध्ये विविध हॉटेल्स, बँका, ज्वेलर्ससह विविध दुकाने आणि कार्यालये आहेत. कोपरीपासून विविध प्रकारच्या गाडया खरेदी विक्रीची दुकाने, तसेच गाडया दुरुस्तीची दुकाने आहेत. कोणत्या दुकानांना पामबीचच्या विरुद्ध दिशेने प्रवेशद्वार आहे, हे तपासण्याचे काम पालिकेच्या नियोजन विभागाकडून सुरू आहे. दुकानांच्या परवानग्या आणि मूळ आराखडे तपासण्यात येत आहेत. सर्व परवानग्या नियमावली तपासून ठोस उपाययोजना करण्यासाठी पालिका ठाम आहे असे यावेळी पालिका आयुक्त रामास्वामी एन यांनी संगीताले.