बेकायदा सावकारी करणार्‍यावर पित्रा- पुत्रावर गुन्हा

0

पुणे : पाच टक्क्यांपेक्षा अधिक दराने व्याज आकारणी करून बेकायदेशीरपणे सावकारी करणार्‍या पित्रा- पुत्राच्या घरावर छापा टाकून जिल्हा उपनिबंधक विभागाच्या पथकाने सुमारे 20 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यात सव्वा कोटी रूपयांचे 29 धनादेश, विविध स्वरूपाचे 43 करारनामे, दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सहकारी कायदयानुसार ही कारवाई करण्यात आली आहे़ सावकारी करणार्‍यांवर जिल्हा उपनिबंधकाच्या पथकाने अनेक वर्षांनंतर केलेली ही पहिलीच कारवाई आहे़ छाप्यात सापडलेल्या दस्तऐवजाबाबत तातडीने सहकार निबंधकांकडे दावे दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिले आहेत़.

सहकारी संस्था विभागाचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली 7 एप्रिलला कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 501 मध्ये छापा टाकण्यात आला. याबाबत सहकार खात्याच्या उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती़ तक्रारीत पाच टक्क्यांपेक्षा अधिक दराने विजय शिवपाद एरंडोल (वय 60) व नरेंद्र विजय एरंडोल (वय 20) सावकारी करीत असल्याचे नमूद केले होते़ याबाबत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी खात्री करून घेतल्यानंतर छापा टाकण्यात आला होता़ उपनिबंधकाच्या पथकाचा छापा सुरू असतानाच एरंडोल पिता- पुत्र बिनधास्तपणे क्रिकेटचा सामना पाहत बसले होते़ एरंडोल परवाना न घेता सावकारी करीत असल्याचे उघडकीस आल्यानंतर उपनिबंधक पोखरकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

छाप्यात सापलेल्या दस्तऐवज नोंदीबाबत आता उपनिबंधक विभागाने चौकशी सुरू केली असून, याबाबत तातडीने दावे दाखल करण्याचे आदेश दिलेेले आहेत. सापडलेल्या दस्तऐवजावरील व्यक्तींना याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या असून, त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती लावंड यांनी दिली.