नवी दिल्ली । अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या 271 भारतीय बेकायदा स्थलांतरितांची माहिती सोपवण्याची मागणी भारताकडून अमेरिकेकडे करण्यात आली आहे. याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले म्हणाले की, अमेरिकन अधिकार्यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, भारतीय स्थलांतरितांच्या यादीतील 271 जणांच्या माहितीत स्पष्टता नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकेतून माघारी पाठवले जाईल. मात्र, याबाबत भारताने त्यांच्याकडे याबाबतचा तपशील मागितला असून अमेरिकेकडून अद्याप ही माहिती देण्यात आलेली नाही.
याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज काल संसदेत म्हणाल्या की, आम्ही ही यादी स्वीकारली नसून या प्रकरणी अधिक माहिती मागितली आहे. माहितीची खातरजमा करूनच आम्ही त्यांना पुन्हा पाठवण्यासाठीच्या आवश्यक प्रक्रियेला सुरुवात करू. राज्यसभेत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज यांनी ही माहिती दिली.
जोपर्यंत आम्हाला या व्यक्तींच्या नागरिकत्वाची खात्री पटत नाही, तो पर्यंत या यादीतील नावांबाबतच्या अमेरिकेच्या दाव्यावर विश्वास कसा ठेवायचा? त्यामुळे आम्ही अमेरिकेकडे या प्रकरणी अधिक माहिती मागितली असून ती मिळाल्यावरच पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्या म्हणाल्या.