बेकायदेशीरपणे दुसऱ्या कंपनीला काम

0

पुणे – खासदार निधीतून मंजूर सिमेंट नाल्याचे काम ठेकेदाराने मुदतीत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत, हेच काम बेकायदेशीरपणे दुसऱ्या कंपनीला देण्याचा प्रताप बारामती कृषी विभागाने केला. याप्रकरणी एसीबीने तत्कालीन ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत त्यातील चौघांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. मौजे जळगाव (ता. बारामती) येथे २०१५-१६ मध्ये खासदार निधीतून सिमेंट नाला बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र ठेकेदाराने हे काम मुदतीत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन ५ अधिकाऱ्यांनी हे काम निविदा न भरलेल्या दुसऱ्या कंपनीला दिले.

याप्रकरणी सिद्धांत कन्स्ट्रकशनला फायदा होण्याच्या हेतूने बेकायदेशीरपणे आदेश काढल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. त्या अनुशंघाने उघड चौकशी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत वरील सर्वांनी सिद्धांत कन्स्ट्रकशनला फायदा होण्याच्या हेतूने बेकायदेशीरपणे आदेश काढल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी एसीबीच्या पथकाने आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १३(१)(क), १३ (१)(ड) सहकलम १३ (२) आणि भा.द.वि कलम १०९ प्रमाणे शनिवारी गुन्हा नोंदवला. यात तत्कालीन उपविभागीय कृषिअधिकारी गोविंद परजणे (वय ६०), बारामती तालुका कृषिअधिकारी संतोषकुमार बरकडे (वय ५०), बारामती कृषिमंडल अधिकारी पोपट ठोंबरे (वय ५७), कृषिपर्यवेक्षक शाहुराज मोरे (वय ४३), कृषिसहाय्यक विजय चांदगुडे (वय ५५) यांचा समावेश आहे. एसीबीने परजणे वगळता इतर सर्वांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.