बेकायदेशीरपणे मद्याची विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0

पाच जणांना अटक : 1 लाख 56 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव । दादरा नगर हवेली येथे विक्रीस मान्यता असणार्‍या विदेशी मद्याची विक्री तळेगावात करणार्‍या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क तळेगाव विभागाने पर्दाफाश आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 56 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवनाथ मोरे, रमेश उंडारे, महेश मोरे, अविनाश घाडगे आणि हेमंत धनराज पाटील अशी त्यांची नावे आहेत.

वाडा येथे विदेशी मद्याची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क तळेगाव विभागाला मिळाली होती. त्यानुसार वाडा येथील महाराष्ट्र चायनीज सेंटर, स्वराज जनरल स्टोअर्स, ए-वन चायनीज सेंटर येथे छापे घालण्यात आले. याठिकाणी दादरा नगर हवेली येथे विक्रीस मान्यता असलेले विदेशी मद्य आढळून आले. सदरचे विदेशी मद्य हेमंत धनराज पाटील या इसमाकडून घेतल्याचे आरोपींनी सांगितले.

घरात सापडले 10 बॉक्स
हेमंत पाटील यांच्याकडील दादरा नगर हवेली विक्रीस मान्यता असलेले विदेशी मद्याचे 10 बॉक्स (480 बॉटल्स) अविनाश दत्तात्रय घाडगे याच्या राहत्या घरात आढळून आले. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व गुन्ह्यातील जप्त विदेशी मद्य असा 1 लाख 56 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग अर्जुन ओहोळ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक दीपक परब, नरेंद होलमुखे, संजय सराफ यांच्या पथकाने केली. या प्रकरणी उपनिरीक्षक नरेंद्र होलमुखे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास निरीक्षक दीपक परब करत आहेत.