बेकायदेशीर फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण

0

भुसावळात वर्दळीच्या मार्गासह पथदिव्यांच्या खांब्यावर लागले फलक ः वाहनधारकांचे लक्ष होतेय विचलित

भुसावळ- डिजिटल फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देवूनही स्थानिक पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राज्यभरातील नगरपालिका तसेच महानगरपालिका पालिका प्रशासनाला अनधिकृत होर्ग्डिंग्जबाबत नुकतेच उच्च न्यायालयाने फटकारले असून होर्डींग काढण्याची ही शेवटची संधी असल्याचे सांगत होर्डींग न काढणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शहरात स्वयं-घोषीत भाऊ-दादांनी वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमांनिमित्त अनधिकृतरीत्या फलक लावले आहेत. पालिका कर्मचार्‍यांचा अंकुश नसल्याने वा आर्थिक चिरीमिरी घेवून फलक लावू दिले जात असल्याचादेखील आरोप असून पालिकेचे मात्र या प्रकारामुळे उत्पन्न बुडत आहे.

फलकांमुळे वाढले शहराचे विद्रुपीकरण
शहरासह महामार्गावर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष, वाढदिवस शुभेच्छा, शैक्षणिक अशा विविध प्रकारचे डिजिटल फलक लावले जात असल्याने शहरांचे विद्रुपीकरण केले जात आहे. अशा डिजीटल होर्डींगवरील जाहिरातीमुळे वाहनधारकांचे लक्ष विचलीत होत असल्याने किरकोळ स्वरूपाच्या व मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. शहरातही नाहाटा चौफुली, जामनेर रोड, महात्मा गांधी पुतळा, जळगाव रोड, वरणगाव रोड, यावल रोड अशा प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात डिजिटल होर्डींग लावण्यात आले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुस्वराज्य फॉऊडेंशन या संस्थेतर्फे जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने त्वरीत होर्डींगबाबत कारवाई न केल्यास संबधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे मात्र यानंतरही पालिका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
राज्यातील मोजक्याच महापालिका व पालिीका प्रशासनाने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरीत चांगलेच खडसावले आहेतसेच येत्या 4 ऑगष्टपर्यंत पुन्हा नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देवून ही शेवटची संधी असल्याचे सांगितले आहे.

अवमानाची होणार कारवाई
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारही होर्डींग काढण्याची कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यास न्यायालयाकडून संबधीत अधिकार्‍यांवर अवमानाची कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. यामुळे शहरातील होर्डींगबाबत पालिका प्रशासन काय कारवाई करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महामार्गावरही होंर्डींग्ज
महामार्गावरही मोठ्या प्रमाणात होर्डींग्ज लावण्यात आल्याने अवजड व इतर वाहनधारकांचे लक्ष विचलीत होत असल्याचे समोर येत आहे तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून महामार्गावरील होणार्‍या अपघाताबाबत वाहनधारकांना जागृत करण्यासाठी दिशादर्शक व अपघात टाळण्यासाठी उद्घोषक फलक लावले आहेत. यामध्ये नजर हटी, दुर्घटना घटी या फलकाचाही समावेश आहे.

अनधिकृत फलकांवर कारवाई करणार -मुख्याधिकारी
शहरातील विविध भागात लावण्यात आलेल्या फलकांची माहिती घेतली जाईल तसेच ज्यांनी अनधिकृतरीत्या फलक लावले आहेत, अशांवर पालिका दंडात्मक कारवाई करेल व पालिकेचे अधिकारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली, असे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले.