भास्कर मार्केटमधील ‘मिम्स’च्या दोघांविरोधात खंडपीठाच्या आदेशाने जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
जळगाव- शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करुन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फि घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चेतन गुणवंत पाटील (वय 28, रा.भुसावळ) या विद्यार्थ्यांने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर कामकाज होऊन न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या संचालिका शैलजा नितीन पाटील व नितीन पंढरीनाथ पाटील या दोन संचालकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना संशय आला अन् बोंब फुटली
चेतन याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने 18 मार्च 2017 रोजी या महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालय एआयसीटीईशी संलग्न असल्याचे संचालिका पाटील यांनी त्यावेळी सांगीतले होते. यानंतर चेतन याने वेळोवेळी करुन एकूण 1 लाख 95 हजार रूपये फी भरली. महाविद्यालयाचे लेक्चर चिंचोली येथील पी.ई.तात्या पाटील इन्स्टिट्यूट येथे होत होते. यावरुन चेतन व त्याचे मित्र शुभम अशोक पाटील, आकाश संजय दीक्षित व पायल उदय मंत्री यांना संशय आला. दरम्यान, हिवाळी इंटर्नशीपसाठी चेतन हा पुणे येथील कंपनीत नोकरी करुन आला. यानंतर त्यांच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा होऊन निकाल लागला. यावेळी मिळालेल्या गुणपत्रकावर एआयसीटीईचा शिक्का नव्हता. त्यामुळे चेतनसह मित्रांनी गुणपत्रक घेतले नाही.
संचालकांकडून जीवेठार मारण्याचीही धमकी
संचालिका पाटील यांना विचारणा केली असता पुणे विद्यापीठाचे सर्टीफिकेट मिळेल असे त्यांनी सांगीतले होते. परंतू, विद्यार्थ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी नंतर पालकांसह संचालिका पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच जीवेठार मारण्याचीही धमकी दिली. यानंतर चेतन याने एआयसीटीई, पोलिसांकडे तक्रार केली. एआयसीटीईकडे माहितीच्या अधिकारातून अर्ज करुन माहिती मिळवली होती. एआयसीटीईने हे महाविद्यालय संलग्न नसल्याचे विद्यार्थ्यांना कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांची फि, कागदपत्रे परत करण्याचेही आदेश केले होते. तरी देखील विद्यार्थ्यांचे पैसे, कागदपत्र दिले नाही. अखेर चेतन याने उच्च न्यायालयात याचिका केली. अॅड.गिरीष नागोरी यांनी विद्यार्थ्यांची बाजु मांडली. न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.