नंदुरबार । वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे सात डंपर जप्त करून नंदुरबार तहसीलदारानी दंडात्मक कारवाई केली आहे. जवळच असलेल्या गुजरात राज्यातील यावल येथून वाळू भरून नंदुरबारमार्गे नासिक, मुंबईकडे धावणार्या वाळूच्या वाहनांनी कहरच केला होता.शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडून ही वाहने बिनधास्तपणे धावत होती. याकडे आर.टी.ओ. पासून तर महसूल अधिकार्याचे साफ़ दुर्लक्ष होते. त्यांच्याच मुकसंमतीने जणू हा खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करू लागले होते.यामुळे तहसीलदार नितीन पाटील यांच्या पथकाने ही सात वाहने अडवून कारवाई केली आहे.
आता वाळू झोन बंद होण्याच्या मार्गावर आहे.गेल्या सहा महिन्यांपासून वाळूचीही वाहने नंदुरबारमार्गे अशीच जात होती.तेव्हा मात्र कारवाई करण्याची धमक अधिकार्यांनी दाखवली नाही,असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. आजही शहादा तालुक्यात मोठया प्रमाणात वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. याठिकाणी कोणत्याही अधिकार्याने ठोस कारवाई केलेली नाही.