जिल्ह्यातील 1 हजार 868 घरकुलांच्या उद्दिष्टांना मंजुरी
पुणे : रमाई आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत मातंग समाजासह अनुसूचीत जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी 2018-19 या वर्षासाठी 99 हजार 376 घरकुलांच्या उद्दिष्टांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1 हजार 868 उद्दिष्टांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी डिसेंबर 2018 अखेर 1 हजार 407 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत बेघर किंवा कच्चे घर असलेल्या कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.
रमाई आवाज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना प्रतिवर्षी 25 हजार घरे मातंग समाजातील लाभार्थ्यांसाठी बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार 34 जिल्ह्यांतील मातंग समाजाची एकूण लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील मातंग समाजासाठी 1 हजार 647 आणि मातंग समाज वगळता अनुसूचीत जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी 221 असे एकूण 1 हजार 868 उद्दिष्टांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख प्रभाकर गावडे यांनी मंजुर उद्दिष्टांपैकी 1 हजार 407 घरकुलांना मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत ज्यांचे नाव नाही. परंतु, ते बेघर किंवा कच्चे घरे आहे, अशा कुटुंबांनी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अर्ज सादर करून रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.
अर्ज सादर करा
जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे उत्तम पध्दतीने काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत मातंग समाजासह अनुसूचीत जाती आणि नवबौध्द संवर्गाला घरकुल देण्यात येणार आहे. त्यानुसार जे कुटुंब पात्र आहेत परंतु, त्यांनी अजूनही अर्ज केला नाही अशा कुटुंबांनी तालुक्यातील गटविकास अधिकार्यांमार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अर्ज सादर करावे.
प्रभाकर गावडे, प्रमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि. प.