भुसावळ। शहरात विविध समस्या निर्माण झाल्या असतांना मुख्याधिकारी वारंवार रजा टाकून विकासकामांकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच आपल्या पदाला ते न्याय देवू शकत नसल्याचे स्पष्ट झाले असून वरिष्ठांचे आदेश पाळत नाही. शहरातील नागरिकांच्या तक्रारीही सोडविल्या जात नसल्याने मुख्याधिकारी बाविस्कर यांची हकालपट्टी करण्याची मागणी जनाधार पार्टीने केली आहे.
दैनंदिन सुविधा देण्यास सत्ताधारी कुचकामी
जनाधार विकास पार्टीतर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची शुक्रवार 28 रोजी भेट घेवून निवेदन देण्यात आले. तसेच मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्या मनमानी कारभारामुळे वैतागलेल्या नगरसेवकांनी प्रांतांकडे आपली व्यथा व्यक्त केली. शहरातील समस्यांचे निराकरण केले जात नसून नागरिकांना दैनंदिन सुविधा देण्यास सत्ताधारी कुचकामी ठरत असल्याची टिकाही जनाधारतर्फे करण्यात आली आहे.
पगारे यांनी केली कारवाईची मागणी
याप्रसंगी निवेदन देतांना गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकुर, प्रदिप देशमुख, नितीन धांडे आदी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी गटनेता उल्हास पगारे यांनी मुख्याधिकारी बाविस्कर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांना देतात धमक्या
मुख्याधिकारी बाविस्कर यांना कुणी तक्रार केली असता तक्रारदाराशी अर्वाच्च भाषेत बोलतात. तसेच त्यांच्याकडे काही थकबाकी असेल तर दंडात्मक कारवाई करण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. सत्ताधार्यांसोबत अनेक अतिक्रमणांना बगल देवून पैसे लाटण्याचे काम करीत असल्याचा आरोपही जनाधारतर्फे करण्यात आला आहे. तसेच नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 77 नुसार कर्तव्यात कसूर केल्याची कारवाईची मागणीदेखील करण्यात आली आहे.