‘बेटी बचाव’साठी पुण्याच्या डॉक्टर दाम्पत्याचे भारत भ्रमण

0

धुळे। ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ आणि ’जल है तो कल है’ हा संदेश घेऊन पुणे येथील डॉक्टर दांम्पत्य भारत भ्रमण करुन जनजागृती करीत आहेत. हे दांम्पत्य आज धुळे महापालिकेत आले होते. त्यांचे महापालिका पदाधिकार्यांनी स्वागत केले. आता पर्यंत त्यांनी 21 हजार किलोमीटरचा प्रवास केला असून पुढे ते अजून भ्रमंती करणार आहेत. यावेळी त्यांनी हुंडा पध्दतीवर कमालीचा आक्षेप घेत मुली वाचविण्यासाठी या प्रथा बंद झाल्या पाहीजेत, असे सांगितले. 9 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दररोज सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास
डॉ.विजय चौधरी व वैशाली चौधरी हे मुळचे देहूरोड जि.पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांनी भारतभर भ्रमण करुन ’बेटी बचाव, बेटी पढोओ’ आणि ’जल है तो कल है’ हा संदेश घेऊन जनजागृती करण्याचा चंग बांधला आहे. ते दि.6 फेब्रुवारी 2017 रोजी पुणे येथून हा महत्वाचा संदेश घेऊन मोटरसायकलने निघाले आहेत. दररोज सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास करुन हा संदेश ते गावा-गावात, शहरांमध्ये देत आहे. या डॉक्टर दांम्पत्यांने आतापर्यंत 29 राज्य त्यांच्या राजधान्या आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा संदेश पोहोचविला आहे. 21 हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पुर्ण केला आहे. यावेळी त्यांना फक्त केरळ राज्यात भाषेची समस्या जाणवली. अन्य 28 राज्यात हिंदी भाषा बोलली जात असल्याने त्यांना कुठलीही अडचण आली नाही. तसेच राजस्थानमधील जयसरमेल ते भारमेल दरम्यानचा प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या असल्याचे जाणवले. कारण, या गावांमध्ये फिरतांना अनेकांनी अन्नासाठी आम्हला नाकारले नाही. परंतू, यासोबत पिण्याचे पाणी मिळणार नाही, असा वाईट अनुभव आम्हाला आला. अखेर एका दारु दुकानात आम्हाला अतिशय थोडेसे पाणी पिण्यासाठी मिळाल्याचा कटू अनुभव त्यांनी सांगितला.

मुख्यमंत्र्यांना भेटणार : ज्या गावात किंवा शहरात थांबले असता तेथील शाळा, महाविद्यालये, तिर्थ स्थळे, जैन स्थानकं, आयटीआय, ट्रेनिंग सेंटर, डिएड महाविद्यालयात जाऊन आणि गावांमधील ग्रामपचायत या ठिकाणी हा संदेश पोहोचवून लोकांमध्ये जनजागृती केली. रस्याने जातांना कोणीही भेटले किंवा शहरातील नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर आदींच्याही भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचविला. धुळे महापालिकेत आले असतांना त्यांचा माजी महापौर जयश्री अहिरराव, सभापती कैलास चौधरी, नगरसेवक मनोज मोरे, राजेंद्र गुजराथी आदींनी सत्कार केला. पुढे ते नाशिक येथे मुक्कामी जाणार आहेत. दोन दिवसांनी मुंबई येथे जनजागृती करुन दि. 9 रोजी मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार असून त्यानंतर आमच्या अभियानाची सांगता करणार असल्याचे डॉ.चौधरी यांनी सांगितले. याच बरोबर काही ठिकाणी आम्हाला विरोध झाला. त्या ठिकाणी आम्ही हुंडा प्रथेविरोधी जनजागृती केली. कारण, पुर्वांचल भागात सात राज्यांमध्ये हुंडा ही प्रथाच नाही. तेथे मुलगा-मुलगी समान आहेत. काही आदिवासी भागातही ही हुंडा प्रथा नाही. गरीब, आदिवासी लोकांमध्ये हुंडा प्रथा नाही. केवळ श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांमध्येच ही हुंडा प्रथा रुड झाली आहे. बेटी वाचवायची असेल तर हुंडा पध्दती बंद झाली पाहीजे, असे मत डॉ.चौधरी यांनी व्यक्त केले.