मुंबई | अमिताभ बच्चनसोबत व ‘संघर्षयात्रा’साठी गाणे गायल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या ‘फिर से’ चर्चेत आल्या आहेत. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढाओ’साठी पार्श्वगायन केले आहे. या विषयावरील ‘अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी मराठीबरोबरच दुसरे एक हिंदी गीतही गायले आहे. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे मराठी गीताचे बोल आहेत.
‘अ ब क’चे लेखन लेखन आबा गायकवाड यांचे असून दिग्दर्शन रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी केले आहे. ‘पेटून उठू दे….’ हे गीत मराठीत अश्विनी शेंडे तर हिंदीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी-टूटूल यांनी संगीतबद्ध केले आहे. सुधीर कुलकर्णी निर्मित ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत हा चित्रपट ‘बेटी बचाव बेटी पढाओ’च्या अभियानाला गती देण्यास उपयुक्त ठरणार आहे.
5 ऑगस्ट रोजी रिलीज
श्रीश्रीश्री रविशंकर यांच्या बंगळुरच्या आश्रमात 5 ऑगस्ट रोजी श्रीश्रीश्रींच्या हस्ते हे गीत रिलीज केले जाणार आहे. यावेळी किरण बेदी, अमृता फडणवीस, आबा गायकवाड, रामकुमार शेडगे, अश्विनी शेंडे, शामराज दत्ता, बापी-टूटूल, सुधीर कुलकर्णी उपस्थित राहतील.
मुलींच्या शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. आजच्या युगातही मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जातो. हे न करता मुलींनाही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी लिहिलेले हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल.
अमृता फडणवीस