बेताल भाजपात बेभान गडकरी !

0

इतरांनी खाल्ले की शेण आणि आम्ही खाल्ले की श्रावणी! अशा पंथातील लोक म्हणजे भाजप. संस्कारी म्हणजे फक्त आम्हीच, बाकीचे सगळे गदर्भी असा रुबाब दाखविणार्‍या आणि तोरा मिरविणार्‍या या पक्षाचे खरे स्वरुप सत्तेच्या काळात जनतेला दिसू लागले आहे. यातूनच त्यांच्याविषयी असलेल्या भ्रामक कल्पना कळून चुकल्या आहेत. ‘वक्तृत्वाला स्पष्टवक्ता’ अशी भलामण करत कोलांटी उड्या आणि बेतालपणा करण्यात या पक्षाच्या नेत्यांचा कोणी हात धरणार नाही. मुळातच अंगुळभर वर चालणार्‍या पक्षाला एकहाती सत्ता मिळाली आणि आभाळाला हात टेकल्याचा भास झाला. यातूनच बेताली नेते बेभान झाले. आता तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाव आल्याने गडकरी बेभानच झाले आहेत.

‘दुरून डोंगर साजरे’ अशी एक सुंदर म्हण आपल्याकडे आहे. असेच काहीसे भारतीय जनता पक्षाविषयी जनतेला 2014च्या निवडणुकीपूर्वी झाले. त्यामुळे भरभरून मते दिली. सोशल मिडियाच्या जाळ्यात मतदार अडकले. यातूनच सगळीकडे राज्ये मिळत गेली. मात्र, डोंगराजवळ गेल्यावर त्यातील ओबडधोबडपणा दिसतो, तसेच जनतेला आता हा भाजप दिसत आहे. सत्तेच्या आडून त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे, हे हळूहळू उघड झाले. तसेच लोकशाहीपेक्षा हुकूमशाही प्रिय असलेल्या नेत्याची लोकप्रियता कमी झाली आहे. याविषयी जनता बोलत आहेच; पण त्यापेक्षा अधिक तीव्रतेने पक्षातील नेते बोलत आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पानीपत झाल्याचाच आनंद काहींना झाला असावा. कारण साडेचार वर्षांत सर्वच मंत्र्यांना मुके केले होते. मात्र, अगोदरच सैल असलेल्या जिभा पराभवाने आनंदी झाल्या की काय असे काहींच्या बाबतीत नक्की वाटू लागले आहे. यामध्ये सर्वात वरचा क्रमांक नितीन गडकरी यांचा लागतो. कारण अलिकडच्या दोन-चार दिवसांतील वक्तव्ये पाहता कानात वारे शिरलेल्या पाड्यासारखे त्यांचे हुंदडलेपण सुरू आहे.

‘एकवेळ हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं, पण भाजप सरकारनं सिंचन योजना पूर्ण करून दाखवली,’ असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात रविवारी केले. याच्या 17 दिवस आधी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर बोलताना, ‘एखादा दुर्मिळ आर्थिक अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यावसायिकाला घोटाळेबाज म्हणणं योग्य नाही. विजय मल्ल्याने विमान कंपनीत आलेल्या अडथळ्यांमुळे कर्ज फेडलं नाही, म्हणून लगेच त्याच्यावर घोटाळेबाज म्हणून शिक्का मारणं योग्य नाही.’ वाह रे व्वा! आणि अशाच वक्तव्याला स्पष्टवक्तेपणाचे संबोधन लावून भुलविले जाते. अगदी ताजी म्हणून त्यांची ही दोन विधाने उद्धृत केली. मात्र, त्यांचे असे का झाले असावे? याला संदर्भ आहे, तीन राज्यांमधील पराभवानंतर 2019 मध्ये भाजपाकडून पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे याचा. यातूनच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात त्यांनी ‘यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते.

यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे’ असा टोला हाणला. तो कोणासाठी होता हे लपून राहिलेले नाही. आता मी तसे म्हणालोच नव्हतोच, माझा तसा म्हणायचा उद्देश नव्हता, माध्यमांनीच मोडतोड करून विपर्यास केला, नको असलेले शब्द माझ्या तोंडी घातले…असा कांगावा करण्यास सुरूवात केली आहे. यालाच म्हणतात संस्कारी कोलांटी उड्या. आता ‘दुसर्‍याचे शेण आणि आपली श्रावणी’ याचे उदाहरण म्हणजे भाजपच्या विरोधात सुरू असलेल्या महाआघाडीला हिणवताना ते म्हणतात, ‘राजकारण हा तडजोड आणि मर्यादेचा खेळ आहे. जेव्हा एखाद्या पक्षाला आपण समोरील पक्षाचा पराभव करु शकत नाही हे माहिती असतं तेव्हा ते आघाडी करतात. आघाडी कधीच आनंदाने केली जात नाही. असहाय्य असल्या कारणानेच ती केली जाते.

नरेंद्र मोदी आणि भाजपाची भीती असल्या कारणानेच कालपर्यंत एकमेकांना दुर्लक्षित करणारे पक्ष आज एकमेकांच कौतुक करत आहेत’. मग गडकरी तुम्ही सांगा, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चुंबाचुंबी करण्यासाठी जो काही आटापिटा सुरू आहे ते काय? त्याला काय म्हणायचे? सेना तुम्हाला दररोज लाथाडतेय तरी तुम्ही तिच्याच मागे लागलाय. महाराष्ट्र, मराठी लोकांच्या आणि देशासाठी आमची युती लाभदायक आहे, असे म्हणता. म्हणजेच दुसर्‍याने केली की भानगड आणि स्वत:चे केले की प्रेम! व्वा रे व्वा. असे बेताल गडकरी पक्षातील लोकांना बेताल म्हणणतात. याच महिन्यात ते म्हणाले होते, ‘आमच्या पक्षातील काहीच लोकांना माध्यमांशी बोलायची भलतीच आवड आहे. त्यांना पत्रकारांशी बोलायला फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे. ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटात आपल्या मुलाची सतत खायची सवय मोडण्यासाठी पालक त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबतात, असे दृश्य आहे. आमच्या पक्षातील काही नेत्यांचे असेच झाले आहे.’ मात्र, आरशात स्वत: डोकवा कधीतरी. गडकरी तरी खूप सोज्वळ बेताल आहेत असे म्हणावे लागते. कारण आमदार प्रशांत परिचारक यांनीही भारतीय सैन्यांबद्दल विक्षिप्त वक्तव्य केले होते. सैनिक सीमेवर वर्षभर राहतात, मग इकडे त्यांना मुलं होतात, असे म्हणत त्यांनी सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. भर सभेत जाहीरपणे या माणसाने अकलेचे तारे तोडले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही दारू विकण्यासाठी महिलांच्या नावाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला होता. दारूचे ब्रँड विकत नसतील तर त्याला महिलांचे नाव द्या. त्यामुळे दारुचा खप वाढेल, असे म्हणत संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान केला होता.

पंकजा मुंडे यांनीही ‘विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा निर्दोष; तो माझा भाऊ आहे,’ असे म्हणत मुलींची छेड काढणार्‍या एका आरोपीला पाठिशी घालण्याचे काम केले होते. अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवाजी महाराजांबद्दल अशाचप्रकारे बेताल वक्तव्य केले होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचीही एका कार्यक्रमात जीभ घसरली. ‘ज्या क्लिप्स तुम्ही रात्री बघता, त्या आम्हीही बघतो. त्यामुळे आम्ही म्हातारे…देठ अजून हिरवा आहे.’ असे शब्द वापरले होते. एकनाथ खडसे यांनीही शेतकर्‍यांच्या भावना दुखावताना म्हटले होते, ‘शेतकर्‍यांकडे वीजबील भरायला पैसे नाहीत, पण मोबाईल खरेदी करायला पैसे आहेत.’ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना ’रडतात साले’ हिणवले होते. यावर कडी म्हणजे राम कदम यांनी एक पाऊल पुढे टाकत, ‘पोरी पटत नसतील तर पळवून आणा, मी पाठीशी आहे,’ असे म्हणत या यादीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे. वाचाळवीरांना कोण आवरणार?