वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार
पुणे : नो एंट्रीमधून भरधाव वाहने चालविणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून मागील काही दिवसांपासून थंडावलेली ही मोहीम वाहतूक पोलिसांकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावरील वेड्यावाकड्या वळणातून वेगाने जाणार्या वाहनचालकांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता जास्त असते. नो एंट्री, राँग साईडने जोरदार वाहन चालवणार्यावर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे.
शहरातील वाहतूक परिस्थिती पाहता काही महिन्यांपूर्वी या कारवाईचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अनेक वाहनचालकांचे परवाने जप्त करुन त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला. परंतु, थोड्याच दिवसांत ही कारवाई थंडावली. यामुळे पुन्हा अशा वाहनाचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्व भूमीवर नव्याने कार्यभार सांभाळणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुन्हा ही कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.