The body of a young man from Dongarkathora was found in a well यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या 32 वर्षीय तरुणाचा गावातील गाव विहिरीत मृतदेह आढळला आहे. या विवाहित तरूणाने आत्महत्या केली की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला याबाबतचा तपास यावल पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश दिलीप ढाके (32, डोंगरकठोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
घराबाहेर पडल्यानंतर परतला नाही तरुण
गणेश ढाके हा तरुण शनिवार, 19 नोव्हेंबर रोजी रात्री घरी जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात बाहेरून येतो, असे सांगून घराबाहेर पडला मात्र घरी परतलाच नाही. या प्रकरणी यावल पोलिसात हरवल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर मंगळवारी गावातील गाव विहिरीत नागरीकांना मृतदेह तरंगतांना दिसला व पोलिस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढल्यानंतर मयताची ओळख पटली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी यांनी धाव घेतली.
जागेवरच केले शवविच्छेदन
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी यावल पोलिसात धनंजय फालक यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या केली की काही घातपात झाला ? याबाबतचा तपास यावल पोलिस करीत आहेत. तपास पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहेत.