धुळे । मुलांच्या रिमांड होममध्ये कृष्णा दिनेश कुमार (पावरा)(वय 15), व विशाल सिंध्या बामणे (वय 13) हे दोन महिन्यांपासून दाखल झाले होते. कृष्णाचे वडील नरडाणा येथे कामाला होते. तेथूनच तो सहा वर्षांपूर्वी घरातून गायब झाला होता. कृष्णा रेल्वेत बसून मुंबई व तेथून हैद्राबादला गेला होता. तेथे तो रेल्वेत बसला होता. मात्र लहान मुलगा एकटा रेल्वेत बसल्याचे पाहून, तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला बाल कल्याण समिती हैद्राबाद येथे दाखल केले. त्यांच्या मार्फतच तो 29 जानेवारी 18 रोजी धुळे रिमांड होममध्ये दाखल झाला.तर विशाल हा गेल्या एक-दीड वर्षांपासून गायब होता. तो बाल कल्याण समिती मुंबई यांच्यामार्फत 3 मार्च 18 रोजी येथील रिमांड होममध्ये दाखल झाला होता. विशेष म्हणजे दोघांच्या गायब होण्याबाबत पोलीस स्टेशनला नोंदही नव्हती. त्यामुळे त्यांच्या पालकांचा, नातेवाईकांचा शोध घेणे जिकरीचे होते. पोलीसही दोघांच्या पालकांचा शोध घेत होते, मात्र शोध लागला नाही.
पहाडी भागात खडतर प्रवास
बालगृहाच्या प्रभारी अधीक्षिका यु.एस. सैंदाणे, योगा शिक्षक राजदीप पाटील, यांनी संस्थेचे सचिव डॉ. एस.टी.पाटील यांच्याशी चर्चा करून शोध घेण्यासाठी संस्थेतील दोन कर्मचार्यांची नियुक्ती केली. बाल कल्याण समिती अध्यक्षा रत्नमाला पाटील, सदस्या उषा साळुंखे यांचे आदेश घेऊन संस्थेचे दोन कर्मचारी बालकांना घेऊन शिरपूर परिसरात गेले. कर्मचारी राकेश पाटील व किसन पावरा यांनी पहाडी भागात शोध घेतला.
बालकांनी केली दिशाभूल
आजुबाजुच्या पाड्यांमध्ये, बोराडी येथील पंडित नेहरू शाळेतील लिपीक, कर्मचार्यांशी संपर्क साधला. एका बालकांने उलट दिशेचा रस्ता दाखवला.मात्र ग्रामस्थांनी हा बालक चुकीची माहिती देत असल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र तरीही कर्मचार्यांनी संयम ठेवला. त्यांनी पाड्यांवरील लोकांची मदत घेऊन तपास करीत,पालकांचा पत्ता मिळविला.
नातेवाईकांना झाला आनंद
कृष्णा हा शिरपूर तालुक्यातील बोराडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील पाड्यावर राहत होता. त्याठिकाणी हे कर्मचारी पोहचले. कृष्णाचे पालक हे मजुरीनिमित्त सुरतला गेल्याचे समजले. या कर्मचार्यांनी कृष्णाला त्याच्या मामाच्या स्वाधीन केले. त्यानंतर हे दोघ कर्मचारी मलगाव या पहाडी गावात पोहचले. त्याठिकाणी विशालला वडील, आजी, आजोबाच्या स्वाधीन केले. बालकांना पहाताच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होताएकाच दिवशी दोन्ही बालकांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात दिल्याने, कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले.