जळगाव । वीस ते पंचवीस दिवसापूर्वी रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या सेवानिवृत्त मनपा कर्मचारी सुभाष यशवंत मराठे (वय-65) यांचा अखेर आज ममुराबाद येथील अरूणामाई फार्मसी महाविद्यालयाजवळील हातेड नाल्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मराठे यांचा सात ते आठ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसात हरविल्याची होती नोंद
प्रजापत नगरात सुभाष मराठे हे पत्नी व मुलगा सचिनसह वास्तव्यास होते. ते सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी होते. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. घरात किरकोळ भांडण झाल्याने सुभाष मराठे 12 फेब्रुवारीला रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकीसोबत नेली होती. तीन ते चार दिवस उलटून देखील वडील घरी परतले नसल्याने अखेर सचिन याने तालुका पोलिस ठाण्यात येऊन वडीलांची बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात येऊन मराठे यांचा पोलिस शोध घेत होते.
अन् दुचाकी सापडली
गेल्या पाच दिवसांपूर्वी विदगाव रस्त्याला शेतकर्यांना एक दुचाकी मिळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले होते. दुचाकी ही मराठे यांची निषन्न झाल्यानंतर त्याच परिसरात मराठे असल्याचा संशय पोलिसांना व कुटूंबियांना असल्याने त्या दिवसापासून विदगाव, ममुराबाद परिसरात मराठे यांचा शोध घेण्यात येत होता. परंतू, पोलिसांना व कुटूंबियांना सुभाष मराठे हे कोठेही मिळून आले नाही.
सकाळी सापडला मृतदेह
रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ममुराबाद येथील अरूणामाई फार्मसी महाविद्यालयाजवळ असलेल्या हातेड नाल्यात ये-जा करणार्या शेतकर्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी लागलीच तालुका पोलिसात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर सचिन मराठे यास बोलवून घेतल्यानंतर मृतदेहावरील कपड्यांवरून हे वडीलच असल्याचे सचिन याने ओळखले आणि त्याठिकाणीच हंबरडा फोडला. मृतदेह लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात वाहनातून नेण्यात आला.