लंडन । टेनिस खेळण्याची सारखीच शैली असल्याने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला जाणकारांनी ‘बेबी फेडरर’ असे टोपण नाव दिले आहे; पण त्याने प्रगल्भ खेळ करत स्वतःच्या शैलीत यंदाची वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली. जागतिक रँकिंगमधील अव्वल आठ टेनिसपटूंमध्ये रंगणार्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये ग्रिगोरने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर 7-5, 4-6, 6-3 अशी मात केली. यंदा प्रथमच त्याने या स्पर्धेत प्रवेश मिळवला अन् पहिल्याच प्रयत्नात ग्रिगोरने ही स्पर्धा जिंकलीदेखील.लंडनमधील बंदिस्त ओ-टू संकुलात पार पडलेली ही फायनल ग्रिगोर व गॉफिन यांच्यात होईल, असा अंदाजही कुणी बांधला नव्हता; कारण स्पर्धेत रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल यांच्यासारखे टेनिसपटू खेळत होते. नदालने पहिली गट लढत गमावल्यावर दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली, तर या लढतीत नदालला हरवणार्या गॉफिननेच उपांत्य फेरीत फेडररचे आव्हान संपुष्टात आणले.
स्पर्धा जिंकणार्या दिमित्रोव्हने रँकिंगमध्ये प्रगती करत तिसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अव्वल क्रमांकावर आहे तो रफाएल नदाल, तर दुसर्या क्रमांकावर रॉजर फेडरर कायम आहे.‘या स्पर्धेत खेळणे हाच मोठा मान आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर मला शब्दच सूचेनासे झाले आहेत. गेले दोनही आठवडे माझ्यासाठी संस्मरणीय ठरले आहे. माझा फिटनेस सांभाळणारे व इतर गोष्टींमध्ये साहाय्य करणार्या सपोर्ट स्टाफचे खूपखूप धन्यवाद’, असे ग्रिगोर म्हणाला. यंदाचा मोसम ग्रिगोरला फळला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल केली होती. तसेच सिनसिनाटी स्पर्धा जिंकून त्याने कारकिर्दीतील पहिले मास्टर्स जेतेपद पटकावले तसेच इतर दोन जेतेपदेही खिशात टाकली.