बेरोजगारीपेक्षा भजी तळणे उत्तम!

0

राज्यभेतील पाहिल्याच भाषणात अमित शहांकडून पंतप्रधानांची पाठराखण

नवी दिल्ली : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेतील पहिल्याच भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली. शहा यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शहा म्हणाले, बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणे केव्हाही चांगले आहे. एखादा गरीब माणूस आज भजी विकत असेल तर त्याच्या भावीपिढ्या उद्योजक होतील. चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, तर या देशात काहीही शक्य आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून भजी विक्रेत्याची तुलना भिकार्‍याशी होते, यावरून त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येतो. सध्या देशात बेरोजगारी आहे, हे आम्ही नाकारत नाही. मात्र, हा काँग्रेसच्या 55 वर्षांच्या राजवटीचा परिणाम आहे. इतकेच होते तर काँग्रेसने त्यांच्या काळात या समस्येवर उपाय शोधून का काढला नाही? असा सवालही शहा यांनी केला.

30 वर्षे देश अस्थिरतेच्या सावटात
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेत अमित शहा यांनी सहभाग घेतला. राज्यसभेतील शहांचे हे पहिलेच भाषण होते. ते म्हणाले, देशात पूर्वीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा बोलबाला होता. विद्यमान केंद्र सरकारला जुन्या सरकारकडून काय मिळाले हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सरकारचा जास्त वेळ पूर्वी पडलेले खड्डे भरण्यातच गेला. देशात 55 वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केले. 30 वर्षे देश अस्थिरतेच्या सावटात वावरत होता. पण 2014 मधील निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक बहुमताने मोदी सरकारला सत्तेवर आणले. देशात आता स्थिर सरकार असून, भाजपने एनडीएतील घटकपक्षांच्या साथीने देशाला पुढे नेले.

शहांनी वाचला कामांचा पाढा
सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचताना शहा यांनी सांगितले की, देशातील 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाखांचा आरोग्य विमा देणारी योजना मोदी सरकारने आणली आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. देशात सरकारने 7 कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधलीत. 2022 पर्यंत प्रत्येक घरात शौचालय असेल, 3 कोटी 30 लाख गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले, 5 कोटी शेतकर्‍यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ मिळाला. आम्ही लोकांना चांगले वाटतील असे निर्णय घेत नाही. आम्ही लोकांसाठी हितकारक निर्णय घेतो. गेल्या 55 वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते मोदी सरकारने केले. शहा म्हणाले, आमचे विश्‍लेषण करताना वेगळ्या दृष्टीने केले पाहिजे. 2013 मध्ये देशाची जी स्थिती आठवा. तेव्हा देशाच्या विकासाची गती थांबली होती. देशात महिला सुरक्षित नव्हत्या. देशाचे संरक्षण करणारे जवानही सरकारच्या निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे काहीच करू शकत नव्हते. 30 वर्षात सत्तेत पूर्ण बहुमत असलेली गैरकाँग्रेसी सरकारे खूप कमी आली. आमच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. तरीही आम्ही एनडीएचे सरकार स्थापन केले. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सरकार गरिबांचे सरकार असेल, हे सरकार गांधी आणि दीनदयाल यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले होते.

मोदी सरकारने विरोधकांना दहशतवादी बनवले; काँग्रेसचा हल्ला
संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. मोदी सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करते. सरकारने तर संपूर्ण विरोधी पक्षांना दहशतवादीच ठरवले आहे, अशा शब्दांत गुलामनबी आझाद यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. गेल्या 70 वर्षांमधील सरकारांपैकी मोदी सरकार हे सर्वात कमकुवत सरकार असल्याचेही ते म्हणाले. 1985 किंवा त्यानंतरच्या काळात काँग्रेस आणि यूपीए सरकारने ज्या ज्या योजना बनवल्या, त्या योजनांची नावे बदलून या सरकारने त्या पुन्हा सुरू केल्या. हे सरकार प्रत्येक योजना सुरू करताना आम्ही गेम चेंजर असल्याचे सांगते. परंतु, मी सांगतो की हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे अशा शब्दांत आझाद यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते पुढे म्हणाले की, त्यांनी स्वच्छ भारत, जनधन योजना, स्कील इंडियासह अनेक योजनांचा उल्लेख केला. या सर्व योजना काँग्रेसच्या काळात बनल्या आणि यांनी मात्र त्यांची नावेच बदलली.