बेरोजगार – शाळाबाह्य युवक-युवतींसाठी ‘लाइट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प

0

18 ते 30 वयोगटातील युवकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी

पिंपरी । बेरोजगार आणि शाळाबाह्य युवक-युवतींसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका एका खासगी संस्थेच्या माध्यमातून ‘लाइट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प’ राबविणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी हे होते. या प्रकल्पांतर्गत 18 ते 30 वयोगटातील युवकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती व्हावी हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. ही संस्था पुणे महापालिकेत ‘लाइट हाउस रोजगार निर्मिती’ प्रकल्प राबवित आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातदेखील हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या तर्फे पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून नागरवस्ती विभागाचे सहायक आयुक्त उल्हास जगताप काम पाहणार आहेत. हा विषय पालिका आयुक्तांनी मंजूर केला असून, स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

  • असा राबवणार प्रकल्प…
    या प्रकल्पांतर्गत 18 ते 30 वयोगटातील युवकांना मोफत प्रशिक्षण
    पहिल्या टप्प्यांत हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वांवर राबविण्यात येणार आहे.
    प्रथम महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर, त्यानंतर पिंपरी गावातील जुने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जागी असलेल्या पालिकेच्या शाळेत हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
    त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा प्रकल्प सुरू होईल.
    पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे या प्रकल्पासाठी स्वतंत्र कर्मचारी.
    प्रशिक्षित कर्मचारी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
    लोकसहभाग वाढविण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समूह संघटक सहभागी.
    प्रशिक्षण घेतलेल्या 50 टक्के लाभार्थींना फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार देणार.