मुंदखेड्याचे आरोपी पोलिसांची नजर चुकवून वाहनासह पसार
मुक्ताईनगर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी केली जात असून बेलसवाडी फाट्यादरम्यान 20 मार्च रोजी नाकाबंदी लावण्यात आल्यानंतर चारचाकी वाहन (एम.एच.41 सी.8093) ची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने पोलिसांनी वाहन चालकाला खाली उतरून वाहनाची तपासणी सुरू केली असता गुटख्याचे काही पोते खाली उतरवत असतानाच संशयीत आरोपी नारायण जयसिंग पवार व अरुण राजपूत (दोन्ही रा.मुंदखेडा, ता.जामनेर) यांनी वाहनासह पोबारा केला. या प्रकरणी 25 रोजी अन्न-सुरक्षा निरीक्षक अनिल कृष्णराव गुजर यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून 21 हजार 250 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत केशरयुक्त पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त केली. पसार आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.