तळोदा । तालुक्यातील बेलीपाडा गावास पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या एक महिन्यापासून बंद असून तसेच ड्युअल पंप ही नादुरुस्त असल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावकर्यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधितांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. पाणी पुरवठा योजना सुरळीत करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी युवा महासंघाने दिला आहे.
निवेदनातील आशय
याबाबत आदिवासी युवा महासंघाचे कार्याध्यक्ष बहादूर सिंग पाडवी यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यातील बेलीपाडा गावास पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या महिन्यापासून नादुरुस्त आहे तसेच हातपंपात लावण्यात आलेला ड्युअल पंप ही नादुरुस्त आहे. यामुळे हातपंपाचा सहारा घ्यावा लागत आले. मात्र, हातपंप अत्यंत हपण्यास जड जात असल्याने महिला व वृद्ध, बालकांना पाणीसाठी श्रम करावा लागत आहे. तसेच ग्रामस्थ पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत असल्याने फार गैरसोय होत आहे. पाणी पुरवठा संदर्भात तक्रार केल्याने ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तर देत असून याकडे आपण लक्ष द्यावे व पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.