बंगळूर-कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी आस्थापने बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बेळगावचे बेलगावी असे नामकरण करण्यात आलेले आहे. तसेच या भागातील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव गेली 12 वर्षे विचाराधीन आहे.
बेलगावीमध्ये काही सरकारी खाती सुरू करण्याचा आपला विचार असून लहान सहान कारणांसाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी इथल्या लोकांना बेंगळूरला यावे लागू नये असे ते म्हणाले. उत्तर कर्नाटकच्या 13 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात येत असून गुरूवारी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. संयुक्त महाराष्ट्रवादी आंदोलकांची सीमाभागातील काही भाग महाराष्ट्रात सामील करण्याची अनेक दशकांची मागणी आहे. कानडी-मराठी असे यावादाचे स्वरूप असून अनेकवेळा ही आंदोलने ताण-तणावाची झालेली आहेत.
महाजन आयोगाच्या अहवालाचा आधार घेत बेळगाव धारवाडसारखी अनेक मराठीबहुल शहरे कर्नाटकमध्ये सामील करण्यात आली. त्यावरून गेली अनेक दशकं हा वाद धगधगलेला राहिलेला आहे. सीमाभागातल्या मराठी शाळांची गळचेपी व कानडीची सक्तीसारख्या अनेक गोष्टी इथल्या मराठी जनतेवर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.