बेवारस वाहनांवर कारवाई कधी? महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

0

हडपसर । शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत नसल्यामुळेच कष्टकरी आणि नोकरदार स्वतःचे दुचाकी किंवा चारचाकी वाहनखरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. शहरात 2000 साली 78 हजार वाहने होती, ती संख्या आता 28 लाखांवर पोहोचली आहे. त्याचा परिणाम शहर आणि परिसरात दररोज शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहेत. आयुर्मान संपलेली आणि भंगार वाहने बेवारस पडून आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी, हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सोलापूर रस्ता, सासवड रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही काही ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातील अनेक वाहने बेवारस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वाहने चोरीची आहेत की, अन्य हेतूने ठेवली आहेत, याचा तपास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने करण्याची गरज आहे.

दंडाच्या रकमेत तिप्पट वाढ
पालिका रस्ता, पदपथावरील अतिक्रमण केलेल्या अवजड वाहनांना 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये केला आहे. हलकया वाहनांना पाच हजार रुपयांवरून तो वीस हजार रुपये केला आहे. सहा व तीन आसनी रिक्षांचा दंड पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये दंड केला आहे. कार व जीपसाठी पाच हजार रुपयांचा दंड आता 15 हजार रुपये केला आहे.

कारवाई अडकली टेंडरमध्ये
गेल्या तीन महिन्यात हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत फक्त 47, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 53, तर वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 45 वाहनांवर कारवाई केल्याचे अतिक्रमण विभागाकडून माहिती दिली. वाहनांवर कारवाई करण्यासाठी हायड्रोक्रेनची आवश्यकता असते.

15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर कारवाई नाही
अपघात व चोरीला गेलेली वाहने दररोज पोलीस स्टेशनमध्ये जमा होत आहेत. अरुंद, चिंचळ रस्ते, पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे दररोज उपनगर आणि परिसरात वाहतूककोंडी नित्याची बाब ठरली आहे. 15 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या वाहनांवर कारवाई होत नाही. अशा वाहनांमध्ये अपुरे इंधन ज्वलनामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे.

पार्किंगसाठी जागा नसल्याने समस्या
पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेक वाहनमालक रस्त्याच्या कडेला सोयीच्या ठिकाणी वाहने लावतात. तर काही ठिकाणी चोरलेल्या वाहनांतील पेट्रोल-डिझेल संपल्यामुळे तेथेच सोडून दिलेली वाहने असण्याचीही शक्यता आहे. बेवारस वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल शिल्लक असते. त्या ठिकाणी एखाद्या वाहनाला किंवा वस्तीमध्ये आग लागली, तर स्फोट होऊन मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तीन महिन्यांत दोन आकडी वाहनांवरसुद्धा कारवाई होत नाही. मात्र, दररोज नव्याने शेकडो वाहने रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहेत. कारवाई आणि नव्याने येत असलेल्या वाहनांवर नियंत्रण राहिले नाही, तर नागरिकांना पायी चालण्यासाठीसुद्धा रस्त्यावर येता येणार नाही, अशी परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेने भंगार वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम स्वतंत्र विभाग तयार केला आहे. आतापर्यंत बोटावर मोजण्याइतक्याच वाहनांवर कारवाई केली आहे.