वाहतूक पोलिसांची कारवाई : चालकाच्या पगारातून कापला जाणार दंड
पुणे : बस चालविताना डबल पार्किंग, नो पार्किंगच्या ठिकाणी बस उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. यामुळे पीएमपीला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असून यापुढे हा दंड चालकाच्या पगारातून वसूल करण्यात यावा, असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून डेपोस्तरावरील अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
पीएमपी बसेसला एका शिफ्टसाठी एका बसवर चालक आणि वाहक ठरवून दिले जातात. यातील काही बेशिस्तांकडून बस कोठेही उभी करून वाहतुकीस अडथळा आणला जातो. यावर वाहतूक पोलीस सुमारे पाच हजार रुपयांचा दंड आकारतात. यामुळे पीएमपी प्रशासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने हा दंड आता संबंधित चालकाकडून वसूल करण्यात येणार आहे.
प्रशासनाने यासंबंधीचे आदेश काढले असून संबंधित वाहतूक अधिक्षकांनी चालकाच्या पगारातून ही रक्कम वसूल करावी, असे सांगण्यात आले आहे. चालकाने पार्किंगच्या ठिकाणीच बस उभी करावी, असा सूचनाही देण्याचे सांगण्यात आले आहे.