बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडीत भर

0

वारजे । एनडीए रस्त्यावरील जुना जकातनाका परिसर व आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणवर अतिक्रमणे होत असतानाही पालिका प्रशासनाकडून मात्र बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने या चौकाचा अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून बेकायदेशीर स्टॉल्सची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आंबेडकर चौकातील अतिक्रमण स्टॉल्सवर काही महिन्यांपूर्वी महापालिकेने नावापुरतीच कारवाई केली होती. परंतु या कारवाईनंतर मात्र अधिक स्टॉल्सची उभारणी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या अतिक्रमणांना नक्की कोणाचा आशीर्वाद मिळत आहे? त्यांना पाठीशी का घालत आहेत असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. जकातनाका परिसरात भली मोठी पत्र्याची शेड टाकून स्टॉल्स उभारले आहेत. दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असल्याने पालिका प्रशासनाच्या बाबतीत अतिक्रमण करणार्‍यांच्या मनात भीती नसल्याचे दिसत आहे. या प्रकारात हितसंबंध जोपासले जात असल्याचे आरोपही नागरिक करीत आहेत. या चौकातील अतिक्रमणांबाबतचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आता तरी यावर कारवाई करणार का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

मुख्य चौक व मुख्य रस्त्याच्या कडेेने अतिक्रमणांचा विळखा वाढत असल्याने पालिका प्रशासन गप्पच असल्याने विविध प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत असल्याने अतिक्रमण विभागाच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात असल्याचे दिसून येते.