पुणे:शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे. गेल्या दोन दिवसात शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन प्राणांतिक अपघात झाले. यामध्ये भरधाव वेगातील वाहनाबरोबरच रस्त्यावरील खड्ड्याने एकाचा बळी घेतला आहे.
अपघात गुरुवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर झाला. पीएमपी बसच्या धडकेत एका ५५ वर्षीय पादचारी महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी पीएमपी बस चालक बाळासाहेब सदाशिव जगताप (वय ४०, रा. ताडीवाला रोड) याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख पटली नव्हती. फुरसुंगी रेल्वे ओव्हरब्रिज येथे एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॅलिसबरी पार्क येथील गिरीधर भवन चौकात बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. रस्त्यावरील खड्डा चुकविताना दुचाकीस्वार घसरून खाली पडला आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संदिप वसंतलाल शहा (वय ४७, रा. गंगाधाम फेज १, मार्केटयार्ड) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालक संजय यशवंत बागल (वय ४३, रा. खटाव, जि.सातारा) यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.