बेशिस्त वाहतुकीवर लगामाची गरज

0

जळगाव । जिल्ह्यातील शहरात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. तोच वाहनधारकांकडून प्रत्येक नियम पायदळी तुडविली जाते. त्यामुळे त्यामुळे शहरात दररोज कोणत्यातरी चौकात वाहतूककोंडी किंवा लहान-मोठे अपघात होत आहेत. साध्या सिग्नलवर थांबविण्याची तसदी सुध्दा काही वाहनधारक घेत नाहीत. त्यासाठी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी पोलीसांनी व वाहतुक शाखेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सोमवारी पोलीस कवायत मैदानावर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी व्यक्त केले.

शहरातील पोलिस मुख्यालयत आवारातील पोलिस कवायत मैदानावर सोमवारी पोलीस व नागरिकांमध्ये जवळीकता कायम रहावी यासाठी शांतता समितीच्या सदस्यांचा बैठक अचानक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, गफ्फार मलीक, डॉ.करीम सालार, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, डॉ.राजेश पाटील,सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सचिन नारळे, जिल्हा शल्यचिकित्सक नागुराव चव्हाण अधिष्ठाता खैरे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

ट्रॅफीक गार्डन सुरु करा
डॉ.करीम सालार यांनी सांगितले की, शहरात मोहल्ला कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या कमिटीची एकही बैठक महिना किंवा वर्षभरात देखील होत नाही.त्यामुळे या कमिटी केवळ नावापुरत्याच आहेत. तसेच तंटामुक्ती अभियानाचीही हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात मुख्य चौक व असंवेदनशिल भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच शहरात ट्रॅफीक गार्डन सुरु करणे गरजेचे असून भविष्यात वाहतुकीची समस्या दुर करण्यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासून वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्हीचे काम अंतीम टप्प्यात
शहरासह जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी 15 लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच समिती सदस्यांनी सुचविल्याप्रमाणे नेरी नाका, पांडे चौक या भागात सिग्नल व्यवस्था सुरु करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.बैठकीनंतर धुुळवड साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी समितीच्या सर्व सदस्यांना रंग लावले. यावेळी उपस्थित प्राध्यापक, नगरसेवक तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही रंग लावून पोलिस दलातर्फे धुळवड साजरी करण्यात आली.