बेसिक कमांडो ट्रेनिंगमधून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे

0

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा उपक्रम

निगडी : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि गोल्डन ग्लेड्स एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाणे मावळ येथील संस्थेच्या विद्यालयात घेण्यात आलेल्या बेसिक कमांडो ट्रेनिंगचा समारोप झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा या ट्रेनिंगचा प्रमुख उद्देश होता. कमांड स्पेशल फोर्स महाराष्ट्रचे चिफ कमांडर दादासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रेनिंग घेण्यात आले. बेसिक कमांडो ट्रेनिंगच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान प्रबोधिनी निगडीचे उपकेंद्र प्रमुख मनोज देवळेकर होते. तसेच इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिभा जोशी दलाल, सचिव रेखा मित्रगोत्री, समन्वयक कमलजित दुल्लत, निर्मल भोगल, जयश्री कुलकर्णी, अर्जुन दलाल, हरबिंदर दुल्लत, संस्थेचे सचिव विजयराव टाकवे, मुख्याध्यापक बाबुराव नवले आदी उपस्थित होते.

विविध विषयांवर प्रशिक्षण

या ट्रेनिंगमध्ये सुमारे 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्व विकासासोबत स्वसंरक्षण ही आजची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनात मार्गदर्शक ठरते. ट्रेनिंग दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना ड्रेस, बॅग व बूट देण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी आरोग्यदायी अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली. भविष्यात सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करण्याची उमेश अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये तयार होते. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना संघटन, दृढीकरण, आपत्ती व्यवस्थापन, शस्त्र प्रशिक्षण, नकाशा वाचन, युद्ध कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, स्व संरक्षण, धनुर्विद्या, आरोग्य व स्वच्छता, राष्ट्रीय एकता, लष्करी प्रवेश योजना, रहदारीचे नियम, पर्यावरण व सामाजिक जाणीव, लाठीकाठी, मनोरंजक गोष्टी व साधने, डोंगर चढाई, नदी प्रात्यक्षिक, सहल, आग यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.