बेस्टचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; मेस्माअंतर्गत कारवाईमुळे कर्मचारी संतप्त

0

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. बेस्ट प्रशासनाने ‘मेस्मां’तर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली आहे, मात्र कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिणामी, मुंबईकरांचे सलग तिसऱ्या दिवशीही हाल सुरू आहेत. कारवाईमुळे बेस्ट कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहे. बेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस पाठविण्यात आली असून भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली. या कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने संप चिघळला आहे.