बेस्टच्या संपाने मुंंबईकरांचे हाल

0

मुंबई – आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टचे पालकत्व मुंबई महापालिकेने स्वीकारावे, या प्रमुख मागणीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून बेस्टच्या सर्व कामागार संघटनांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल 3 हजार 800 बसगाड्या आगारांमधून बाहेर पडल्या नाहीत, 36 हजार कर्मचारी बसून होते. विशेष म्हणजे आज रक्षाबंधनाचा दिवस होता, तसेच कार्यालयीन दिवस होते. त्यामुळे मुंबईकरांना इच्छीत स्थळी पोहोचण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. याचा गैरफायदा रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतला. त्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूट केली.

सणासुदीला बेस्ट संपामुळे मुंबईकरांची कोंडी आज सकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवरून एकही बेस्ट बसगाडी धावली नाही. या संपामुळे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांची गोची झाली. अनेकांना आपल्या बहिणीच्या घरी तर बहिणींना भावाच्या घरी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यामुळे यावर्षीचे रक्षाबंधन हे मुंबईकरांसाठी कष्टप्रद बाब बनली होती. तरी बहिण-भावाचे नाते हे दुधाच्या साईप्रमाणे असल्यामुळे दोघांकडूनही निश्चित स्थळी पोहचण्यासाठी जीवाची बाजी लावण्यात येत होती. त्यासाठी कितीही संकटे, अडथळे आली, तरी ते पार करण्यात येत होती.

रिक्षा चालकांकडून लूटबेस्ट कामगारांनी केलेल्या संपामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना घरापासून सोय असलेली बस सेवा बंद असल्याने अनेकांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी रिक्षावर अवलंबून राहावे लागले. यामुळे रिक्षाचालकांनाही चांगलाच भाव आला होता. काही वेळा त्यांनी भाडे नाकारण्याचे प्रकारही दिसून आले. यामुळे रक्षाबंधनासाठी निघालेल्या नागरिकांना रिक्षासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागले. अंधेरी पूर्व येथे सहार गाव, जेबीनगर, सहार विमानतळ आदी ठिकाणी जाण्यासाठी सकाळपासूनच रिक्षा पकडण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या. त्यात सहार ते अंधेरी जाण्यासाठी 10 रुपये शेअर असताना 20 ते 30 रुपये भाडे रिक्षाचालक प्रवाशांकडून घेत आहेत. संध्याकाळी तर हेच भाडे 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बॉक्सबेस्ट संपाचा फटका किती?
3 हजार 800 एकूण बस बंद, 36000 संपावर गेलेले बेस्ट कर्मचारी, 500 मार्गांवर एकही बस नव्हती, 30,00,000 प्रवाशांचा खोळंबा.

रिक्षावाल्यांनी प्रवाशांंकडून जास्त भाडे आकारल्यास त्या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रवाशांंनी कोणत्याही रिक्षाचालकास जादा भाडे देवू नये. त्याची तक्रार त्या ठिकाणी असलेल्या ट्रॉफिक पोलीसांना करावी.
– पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त