मुंबई- बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. आज या संपाला एक आठवडा पूर्ण होत आला आहे. मात्र अद्यापही संपावर तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आजही संप कायम आहे. बेस्टचा संप असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान संपाबाबत दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.
राज्य सरकारने याप्रश्नी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमून त्याआधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीमध्ये झालेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. संपाबाबत न्यायालय कोणते आदेश देते याकडे कामगार संघटनांसह सर्वाचेच लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपाबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे काल रविवारी सांगितले होते. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र, अवाजवी मागण्या केल्या तर आणखी समस्या निर्माण होतील, असे ठाकरे म्हणाले. संपावर असलेल्या एकाही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या संपातून मार्ग निघणे गरजेचे असून आम्ही सर्वाशी चर्चा केली, मात्र मार्ग निघू शकला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली.