मुंबई । बेस्टचा तोटा कमी होण्याची चिन्हे नसतानाच उपक्रमाने बस ताफा कमी करणे, काही मार्गांवर भाडेवाढ, भाडेतत्त्वावर बसेस घेणे, अधिकार्यांची संख्या कमी करणे, कर्मचार्यांना देण्यात येणार्या सवलतीत कपातीसारख्या विविध शिफारशी केल्या आहेत. बेस्ट समितीच्या 23 ऑगस्टच्या बैठकीत उपक्रमातर्फे सुधारणांचा नवीन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे बेस्ट समितीच्या बैठकीप्रमाणेच उपक्रमात चांगलेच वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात, बसफेर्यांमधील प्रवासी संख्या 40 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तिथल्या फेर्या बंद करून अन्यत्र वळविण्याचीही सूचना आहे.
बसची संख्या कमी करण्याची सूचना
सध्याचा 3,790 बसेसचा ताफा कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात जुन्या 453 बसेस सेवेतून बाद करून ही संख्या 3,337 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा मानस आहे. कमी बसेसमुळे खर्चात कपात होण्याच्या उद्देशाने हा मार्ग सुचविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अकार्यक्षम 1703 बसेस मोडित काढून 1250 बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचाही प्रमुख प्रस्ताव आहे. बेस्टच्या दैनंदिन पासांच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सध्याचे 70 रु., 50 रु., 40 रु.चे दर 90 रु., 60 रु., 50 रु. करण्याचा उपक्रमाचा मानस आहे. त्याचप्रमाणे सकाळी 11 ते सायं. 5 पर्यंत दैनंदिन पासाची आनंदयात्री योजना बंद करण्यावरही भर दिला आहे. विद्यार्थी बसपासात वाढ पाचवीपर्यंत आणि सहावी ते बारावी, बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी पास वाढविण्याची सूचना आहे. 5वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना मासिक 150 रुपयांचा पास अनुक्रमे 200 आणि 250 रु. इतका वाढवण्याची योजना आहे.