बेस्ट’च्या ४४ हजार कर्मचार्‍यांचा पगार १० तारखेलाच झाला

0

मुंबई | बेस्ट संपाच्या पाश्ववभूमीवर दिलेल्या आश्वासनानुसार ‘बेस्ट’च्या ४४ हजार कर्मचार्‍यांचा पगार काल १० तारखेलाच त्यांच्या खात्यावर जमा झाला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पगारासाठी होणारा विलंब कायमस्वरूपी संपल्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . पगार वेळेत मिळत नसल्यामुळे ‘बेस्ट’चे कर्मचारी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे कर्मचारी दुसर्‍याच दिवशी कामावर रुजू झाले होते.

आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ प्रशासनाला मार्च महिन्यापासून कर्मचार्‍यांचे पगार देणेही कठीण झाले होते. त्यामुळे कर्मचार्‍यांचा पगार महिन्याअखेर पर्यंत लांबत होता . त्यामुळे सर्वसामान्य कर्मचार्‍यांची आर्थिक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेचाच उपक्रम असलेल्या बेस्टला महापालिकेने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी बेस्टच्या नऊ संघटनांनी कृती समिती स्थापन करून निर्णायक लढा सुरू केला होता. उपोषण करूनही दाद न देणार्‍या पालिका प्रशासनाविरोधात ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर गेले होते. ऐन रक्षाबंधन आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा संप झाल्यामुळे बेस्टच्या ३५ लाख प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृती समिती आणि प्रशासन यांच्यात यशस्वी मध्यस्थी करून सर्व कर्मचार्‍यांचे पगार १० तारीखपर्यंत देऊ असा शब्द दिला होता. त्यानुसार पगार खात्यावर जमा झाल्यामुळे कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले .

असा होतो पगार
बेस्टच्या ४४ हजार कर्मचार्‍यांचा महिन्याचा पगार देण्यासाठी १८० कोटी रुपये लागतात. यातील ८० कोटी रुपये कर्मचार्‍यांच्या खात्यावर थेट जमा होतात. तर कर्मचार्‍यांचा पीएफ, विमा हफ्ते, कर्जाच्या हफ्त्यांसाठी १०० कोटींचा खर्च येतो. हा खर्च वजा करून गेल्यानंतर उर्वरित राहिलेला पगार कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा केला जातो.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बैठका
‘बेस्ट’ चालवायची असेल तर उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारलीच पाहिजे अशी भूमिका पालिका या आयुक्तांची असल्याने त्यानुसार बेस्ट प्रशासन, बेस्ट समिती अध्यक्ष, संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. या बैठकांमध्ये बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

यावर बोलताना बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, यांनी सांगितले कि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘शब्दा’नुसार कर्मचार्‍यांचे पगार वेळेतच त्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे सांगत . यापुढेही कर्मचार्‍यांचे पगार १० तारीखपर्यंत होतील. असा विश्वास प्रकट केला त्याचबरोबर आगामी काळात बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाय करण्याबाबत संयुक्त बैठका सुरू असून लवकरच बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले .