मुंबई । मुंबईकरांची सेकंड लाइफलाइन असलेल्या बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार, महापालिकेने अर्थसाहाय्य करावे, चांगल्या दर्जाच्या बसेस आणि सेवा पुरवणे, कमी अंतरावरील प्रवाशांना बेस्टकडे आकृष्ट करणे, बेस्ट उपक्रमावरील करांचा बोजा कमी करणे, बस सेवेसाठी स्वतंत्र मार्गिका, खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासारखे अनेक उपाय बेस्ट मुख्यालयातील बैठकीत शनिवारी सुचवण्यात आले. बेस्टविषयी असणारा जिव्हाळा आणि बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाय मुंबईतील ज्येष्ठ वाहतूक तज्ज्ञांनी विशेष बैठकीत मांडले.जगभरातील अनेक देशांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम राहण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जातात. त्यात बसेससाठी स्वतंत्र मार्गिकांचाही समावेश आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.
प्रवासी बेस्टकडे वळवण्याची सूचना
1 या बैठकीला बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह काही समिती सदस्य सहभागी झाले होते. त्यासह अमिता भिडे, सुधीर बदामी, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते, अजित शेणॉय, सिमप्रीत सिंह, तृप्ती अमृतवार वैतिला, गिरीश श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
2या सर्वांनी एकत्र येत बेस्ट बचाव भूमिकेचे निवेदन बेस्टचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापकांना पाठवले होते. रेल्वेचे निम्मे प्रवासी बेस्टकडे आल्यास गर्दीचे नियोजन होईल. त्यासाठी बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकेची बीआरटीएस योजना आखायला हवी. मेट्रो आवश्यक असली तरी मेट्रोसाठी येणारा खर्च प्रचंड आहे.
3 महिलांच्या दृष्टीने सुरक्षित प्रवासाचा मुद्दा अमिता भिडे यांनी मांडला. अशोक शेणॉय यांनी मुंबई पालिकेने बेस्टला अर्थसाहाय्य करायला हवे, महामार्गांवर 90 टक्के खाजगी वाहने दिसतात.