बेस्ट उपक्रमाला बनावट नोटांचा जबर फटका

0

मुंबई । केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जुन्या नोटा बंद करून नवीन नोटा चलनात आणल्या. या बनावट नोटांचा मोठा आर्थिक फटका तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला बसल्याचेही उघडकीस आले आहे. बेस्ट उपक्रमाला गेल्या वर्षभरात तब्बल 2 लाख 6 हजार 550 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. बेस्ट उपक्रमाला एप्रिल -2016 ते मार्च -2017 या कालावधीत 1194 कोटी 52 लाख 71 हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. यामध्ये, 2 लाख 6 हजार 550 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. या बनावट नोटांमध्ये 1 हजार रुपयांच्या 89 नोटा, 500 रुपयांच्या 170 नोटा,100 रुपयांच्या 45 नोटा आढळून आल्या आहेत.

बँकांकडून नोटा स्वीकारण्यास नकार
बेस्ट परिवहन विभागाचे दररोजचे उत्पन्न आय.सी.आय.सी.आय.,बँक ऑफ इंडिया, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये जमा केले जाते. या बँकांमध्ये भरलेल्या रकमेत 2 लाख 6 हजार 550 रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये,बस तिकिटांपोटी जमा बनावट नोटांची रक्कम 1 लाख 78 लाख 500 रुपये इतकी तर बस पास पोटी जमा बनावट नोटांची रक्कम ही 35 हजार 50 रुपये इतकी आहे. मात्र बेस्टने काही बसपास धारकांकडून प्राप्त 7 हजार रुपयांच्या बनावट नोटा बदलून घेतल्या आहेत. मात्र तरीही बेस्टला प्राप्त एकूण उत्पन्नातील 2 लाख 6 हजार 550 रुपयांच्या बनावट नोटांचा फटका बसल्याने बेस्ट उपक्रमाने ह्या नोटांचे मूळ मालक सापडणे कठीण वाटल्याने बेस्टच्या उत्पन्नातील एवढी रक्कम कोणावरही जबाबदारी न टाकता निर्लेखित करण्याचा निर्णय घेतला त्यास बेस्ट समितीनेही मंजुरी दिली आहे.

महिन्यातच सर्वाधिक बनावट नोटा
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर केल्याने त्यानंतरच्या 20-22 दिवसात बेस्ट कडे 1000 रुपयांच्या नऊ तर 500 रुपयांच्या दहा बनावट नोटा आढळून आल्या. यामुळे बेस्टला सुमारे चौदा हजार रुपयांचा फटका बसला. ह्या नोटबंदीच्या महिन्यात वर्षभरातील सर्वाधिक बनावट नोटा आढळल्या असल्याने ह्याबाबत बेस्ट समितीत अनेक सदस्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.