मुंबई । बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कामगारांना वर्षभरापासून भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रॅज्युइटीची रक्कम मिळालेली नाही. यासाठी दोन कर्मचारी न्यायालयातही गेले. यातील एकाला थकीत रकमेवर 10 टक्क्यांनी पैसे देण्याचे आदेश कोर्टाने दिले. अशा प्रकारे जर प्रत्येक कामगारास 10 टक्क्यांनी पैसे द्यावे लागले तर बेस्टला आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. त्यामुळे बेस्टने 5-6 टक्क्यांनी पैसे घेऊन सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणी द्यावी. तसेच वेळेत त्यांना थकीत देणी मिळाली नाहीत तर शेतकर्यांप्रमाणे त्यांनाही आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा असे भाजपचे सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी दिला.
बेस्टला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी कवठणकर यांनी अनेक उपाय योजना सुचविल्या. बस थांब्यावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागू नये यासाठी बस सोडण्यासाठी योग्य नियोजन करावे. यासाठी बस आगारातील अधिकार्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात यावे. ट्रायमॅक्स नादुरुस्त व अपुर्या असल्याने त्याचा फटका बसून बेस्टच्या महसुलावर परिणाम होत असल्याचे कवठणकरा यांनी निदर्शनास आणून दिले.
तूट अर्ध्याहून कमी होण्याचा विश्वास
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. यातील अनेक सूचना बेस्ट समितीने स्वीकारल्या असून याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास बेस्टच्या सन 2017-18 च्या अर्थसंकल्पातील तूट 880. 88 वरून 376. 77 कोटींपर्यंत कमी होऊ शकते असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी यावेळी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले.Ý