बेस्ट कर्मचारी संपावर ठाम; उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक

0

मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारीपासून संप पुकारला आहे. आज संपावर तोडगा निघून संप मिटेल असे वाटत होते, मात्र कर्मचारी संपावर कायम आहे. सरकार आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप मिटल्याची घोषणा करा असा आग्रह करत आहेत. तर दुसरीकडे तोडगा निघेपर्यत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. उद्या पुन्हा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव या तिघांचा समावेश आहे. याचिकेवर आज शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली.

राज्य सरकारने ‘मेस्मा’ लागू केल्यानंतरही संप मागे घेण्यात आलेला नाही. या संपाविरोधात अ‍ॅड.दत्ता माने यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. सकाळी झालेल्या सुनावणीत बेस्ट व राज्य सरकारने संप बेकायदा असल्याचे हायकोर्टात सांगितले. दुपारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने हायकोर्टात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात समिती नेमल्याची माहिती दिली. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव यांचा समावेश असल्याचे हायकोर्टात सांगण्यात आले. या समितीची पहिली बैठक दुपारी चारच्या सुमारास पार पडणार असल्याची माहितीही देण्यात आली. तर दुसरीकडे चार वाजता झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची चिन्हे जास्त आहे.