बेस्ट कर्मचार्‍यांचे उपोषण सुरू

0

मुंबई : बेस्ट हा मुंबई महापालिकेचा उपक्रम आहे, त्यामुळे तोट्यात चाललेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने आर्थिक मदत करावी आणि बेस्टची जबाबदारी महापालिकेने स्विकारावी या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी व बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य मंगळवारपासून वडाळा डेपो परिसरात बेमुदत उपोषणला बसले आहेत. बेस्ट कर्मचार्‍यांनी आपल्या अस्तित्वासाठी 12 संघटनांसह बेमुदत उपोषण पुकारले आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसले आहेत. तर बेमुदत उपोषणाला बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव, रंजन चौधरी, ज.म.कहार, अरुण दळवी, नितीन पाटील, डी.के. सिंह हे प्रमुख नेते तसेच सुहास मांजरेकर, अविनाश तांदळे, देवेंद्र दुबे, बाळासाहेब पोटे, संजय आंब्रे हे कर्मचारी देखील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सर्वच राजकीय पक्षांना मुंबई महापालिका आयुक्त जुमानत नाही. वारंवार बेस्ट संदर्भात बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता केवळ बेस्टला मदतीचे आश्वासन देतात, मात्र ठोस असे उत्तर देत नाही. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी व बेस्ट वाचवण्यासाठी सर्व बेस्ट कर्मचारी व संघटनांनी आयुक्तांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.