मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर आज सकाळी झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं हा संप सुरूच राहणार आहे. संप सुरू ठेवून प्रशासनाशी वाटाघाटी करत राहू, अशी माहिती बेस्ट कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली आहे.
सुधारीत वेतनश्रेणी, दिवाळी बोनस आणि बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज पाचव्या दिवशी सुरू आहे. सुरुवातीला संपाकडं दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनानं कालपासून गांभीर्यानं कर्मचारी संघटनांशी चर्चा सुरू केली आहे. महापौरांच्या उपस्थितीत काल झालेली चर्चाही निष्फळ ठरली. तसंच, मुंबई उच्च न्यायालयानं या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारनं उच्च स्तरीय समितीची स्थापना केली होती.
या उच्चस्तरीय समितीची आज सकाळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. मात्र, यातून काहीच ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळं संप सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कामगार कृती समितीनं घेतला आहे. शशांक राव यांनी ही माहिती दिली.