‘बेस्ट’ कामगारांचा संप अखेर मागे

0

मुंबई । आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला वाचवण्यासाठी खासगी गाड्या भाड्यावर घेण्याचा प्रस्ताव नुकताच बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी आणि कामगार संघटना संतप्त झाल्या असून 15 फेब्रुवारीपासून संपाचा इशारा दिला होता. याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष व पालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याने बेस्ट कर्मचारी संपावर जात असल्याचा इशारा बेस्ट कर्मचारी कृती समितीचे शशांक राव यांनी दिला होता. मात्र बेस्टचे खाजगीकरण करू नये तसेच कर्मचार्‍यांनी संपावर जाऊ नये असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिल्यावर संप मागे घेण्याचा निर्णय बेस्टमधील कामगार संघटनांनी घेतला.

हजारो कामगारांचा होणार होता संप
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने काही सुधारणा करण्याचे सूचित केले होते. यानुसार बेस्ट समितीने सुमारे 80 टक्के सुधारणा करण्यास बेस्ट समितीत मंजुरी दिली होती. मात्र, यामध्ये बेस्टमध्ये खासगीकरणाच्या माध्यमातून बेस्ट बस चालवण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे पालिका आयुक्तांनी बोनसपोटी दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून कामगारांच्या पगारातून 500 रुपये कापण्यास सुरुवात केली होती.

बेस्ट समितीतीत खासगीकरणाला मंजुरी
बेस्ट कामगारांच्या हिताचा विचार करून बेस्टला सक्षम करण्यासाठी सदर प्रस्तावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. मात्र, याबाबतीत न्यायालयात दावा दाखल असल्याने न्यायालयाच्या निर्णयावर सदर प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे भाजपचे सुनील गणाचार्य यांनी सांगितले. सदर बसगाड्या खासगीरीत्या चालवल्यानंतरही जी तूट राहील ती भरून कशी काढणार, असा सवाल रवी राजा यांनी केला होता तसेच पालिका आयुक्तांनी बेस्टला भांडवली खर्च देण्याचे कबूल केल्याचे असल्याने यासाठी लागणारे 600 कोटी रुपये आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी केली, तर सुहास सामंत यांनी आर्थिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने आम्ही या प्रस्तावास मान्यता देत असल्याचे स्पष्ट केले. खासगीकरणाच्या माध्यमातून कंत्राटदारांमार्फत बेस्ट प्रशासनाकडून एकूण 450 बसगाड्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये 200 वातानुकूलित मिनी बसगाड्या, 200 मिनी बिगरवातानुकूलित व 50 मिडी बिगरवातानुकूलित गाड्यांचा समावेश आहे. या बसगाड्या सात वर्षांच्या कंत्राटावर घेण्यात येणार आहे.