बेस्ट प्रशासनातील टीसी प्रवाशांना आता स्पीकरवरून आवाहन करत बोलावतेय

0

मुंबई । बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आता प्रशासनाने चक्क तिकीट तपासनीसांना कामाला जुंपले आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेला हे तपासनीस हातात मेघा फोन घेऊन प्रवाशांशी संवाद साधतात. बेस्ट उपक्रम हा आपला उपक्रम असून प्रवाशांनी बस सेवेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, अशी विनंती हे तपासनीस करत असताना अनेक महत्त्वाच्या थांब्यांवर अथवा बेस्ट आगारात पाहावयास मिळतात. याचा फायदा एक टक्का बेस्टचे प्रवासी वाढण्यात झाल्याचा दावा केला जात आहे. पण बसगाड्यांची केविलवाणी अवस्था पाहता हा उपक्रम फारसा फायदेशीर होईल असे वाटत नाही.

अनेक फायदेशीर मार्गांवरील बससेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यातून जुन्या बसगाड्यांचा ताफाच बेस्ट उपक्रम वापरत असून अशा खटारा गाड्यांतून प्रवास करून कंबर दुखापत होण्यापेक्षा ओला-उबेर, रिक्षा व कालीपिली टॅक्सीतून प्रवास करणे लोक पसंत करत आहेत. बेस्ट उपक्रमाकडे बसेसचा ताफ कमी असल्याने अनेक मार्गांवरील बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. मुंबईची शान असलेली बेस्ट बससेवा जगली पाहिजे, असे लाखो मुंबईकरांना वाटते, पण बेस्ट उपक्रमातील अनागोंदीच्या कारभाराची किंमत बिचार्‍या चालक-वाहकांना मोजावी लागते.

प्रवासी संख्या वाढल्याचा दावा
दिवस-रात्र मेहनत करूनही हक्काचा पगार वेळेवर मिळत नाही, अशी खंत कामगारांमध्ये व्यक्त केली जात आहे. पालिकेनेही बेस्टला सापत्न वागणूक दिल्यामुळे सध्या हा उपक्रम शेवटची घटका मोजत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा शिरावर घेऊन या उपक्रमातील कर्मचारी जगत आहेत. बेस्टच्या या अवस्थेकडे प्रवाशांनीही पाठ फिरवली असून दुरावलेले प्रवासी अशा मेगा फोनच्या माध्यमाने बेस्टकडे परत येणार नाहीत, त्यासाठी आपल्या ताफ्यात नव्या बसगाड्या आणून त्यांची चांगल्या प्रकारे सेवा जनतेला दिली गेल्यास बेस्टवर पुन्हा जनतेचा विश्‍वास बसेल व दिवसेंदिवस रसातळाला चाललेल्या या सेवेला पुनर्जन्म मिळेल, अशी भावना लाखो प्रवासी व्यक्त करत आहेत.