बेस्ट महाव्यवस्थापकांच्या विरोधात अविश्‍वास ठराव!

0

मुंबई । बेस्ट समितीच्या बैठकीत सध्या ट्रायमॅक्स मशीनचा मुद्दा खूपच गाजत आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक बागडे यांनी बेस्ट समितीला टार्गेट करीत पालिका आयुक्त यांच्यामार्फत थेट नगरविकास खात्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे संतप्त बेस्ट समितीने आक्रमक पवित्रा घेत महाव्यवस्थापक बागडे यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाव्यवस्थापक हे मनमानी कारभार करून बेस्ट समितीच्या अधिकारांवर गदा आणण्याचे व समितीला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना सदस्य अनिल कोकिळ यांनी, महाव्यवस्थापक यांच्याविरोधात पालिका सभागृहात अविश्‍वास ठराव आणण्याचा इशारा बेस्ट समितीच्या बैठकीत दिला आहे.

मशीनचा पुरवठा रोखला
सर्व पक्षीय नगरसेवकांनी ट्रायमॅक्स मशीनचा पुरवठा होत नसल्याने बेस्टचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून या परिस्थितीला महाव्यवस्थापक बागडे यांचा मनमानी कारभारच जबाबदार आहे, असा पलटवार करीत महाव्यवस्थापक बागडे यांना चांगलेच फैलावर घेतले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, ट्रायमॅक्स मशीनचा पुरवठा होत नसल्याने बेस्टच्या बसमधून अनेक प्रवासी मोफत प्रवास करीत असून महाव्यवस्थापक बागडे यांनीच ट्रायमॅक्सच्या मशीनचा पुरवठा होऊ न देण्याचा घाट घातल्याची टीका करीत महाव्यवस्थापक बागडे यांना लक्ष्य केले. कोकिळ यांनी, ट्रायमॅक्स मशीनचा होणारा पुरवठा महाव्यवस्थापक यांनीच परस्पर निर्णय घेऊन रोखला असून त्याचा बेस्टच्या परिवहन विभागाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप केला.

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी, ट्रायमॅक्स मशीनबाबत मुदतवाढ देणार्‍या बेस्ट समितीचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी तक्रार पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे एप्रिल 2018 मध्ये पत्राद्वारे केली होती. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महाव्यवस्थापक बागडे यांनी केलेली तक्रार पुढे नगरविकास खात्याकडे पाठवली आहे.त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले.