गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची माहिती
मुंबई :- बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी म्हाडाच्या वांद्रे कार्यालयातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दीपक पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार एसीबीने गुन्हा दखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची खुली तपशीलवार चौकशी सुरु असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराला दिली.
या प्रकरणी सदस्य सुनील केदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते. म्हाडाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक पवार यांच्या विरोधात २०१२ मध्ये मुक्त चौकशी झाली असून या उघड चौकशीमध्ये आरोपी पवार यांनी जानेवारी २००१ ते मार्च २०१२ या सेवा कालावधीत कायदेशीर उत्पनापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात ३० जानेवारी २०१८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.तसेच या संपूर्ण प्रकरणाची खुली तपशीलवार चौकशी सुरु आहे.
या प्रकरणात पवार यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या मालमत्ता आणि खात्यांची चौकशी केली करून कारवाई केली जाईल, असेही डॉ.पाटील यांनी सांगितले. तत्कालीन कार्यकारी अभियंता पवार यांच्या विरोधात एसीबीमार्फत चौकशी सुरु असताना त्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती का देण्यात आली या संदर्भात सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी प्रश्न विचारला असता या संदर्भात कायद्याचे प्रावधान तपासून अशी मान्यता दिल्याप्रकरणी चौकशी केली जाईल, असेही डॉ.पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.