बैठका घेतल्याने भाजपाचे माजी शहराध्यक्ष गोत्यात

0

अमळनेर । गेल्या दीड महिन्यात अमळनेर शहरात भाजपा कार्यकर्त्यांच्या अनधिकृत बैठका घेतल्या प्रकरणी माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे अडचणीत आले असून जिल्हास्तरावरून पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या नोटीसीत माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांचाही संदर्भ असल्याने पक्षाने हा विषय चांगलाच गांभीर्याने घेतलेला दिसत आहे. भाजपचे जळगाव जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनिल नेवे व जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांच्या स्वाक्षरीने 30 नोव्हेंबर रोजी ही नोटीस बजावली आहे.

काय म्हटले आहे नोटीसीत?
गेल्या दीड महिन्यात आपण अमळनेर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठक बोलावल्या आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शितल देशमुख यांना कोणतीही सूचना न देता व तशी परवानगी न घेता आपण व डॉ.बी.एस.पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे. प्रत्यक्षात ही बोलावलेली बैठक अनधिकृत असून पक्षशिस्त भंग करणारी आहे. यामुळे आपण यासंदर्भात आठ दिवसात लेखी खुलासा करावा, अन्यथा पक्ष आपल्यावर उचित कारवाई करेल, असा इशारा देखील दिला आहे.

पक्षशिस्ती विरोधात काम करणार्‍यांना चपराक
दरम्यान शितल देशमुख यांना पक्षाने शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली असताना लांडगे हे कार्यकार्‍यांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी शहराध्यक्ष पदावर खोटा दावा करीत होते. मात्र पक्षाने लांडगे यांना बजावलेल्या नोटीसीत शितल देशमुख यांचाच शहराध्यक्ष म्हणून उल्लेख केल्याने लांडगे हे दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले असून व घेतलेल्या अनधिकृत बैठकांमुळे ते अडचणीत देखील आले आहे. या कार्यवाहीमुळे पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तसेच या कार्यवाहीत डॉ.बी.एस.पाटील देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.