बैलगाडा मालकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

0

पुणे । जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बैलगाडा मालकांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री दडपले. रात्री दीड वाजता चारशे ते पाचशे पोलिसांनी बैलगाडा मालकांना जबरदस्तीने हुसकावून लावले. तसेच मंडपाची तोडफोड करून सामानाची फेकाफेक केली, असा आरोप बैलगाडा मालकांनी केला आहे. बैलगाडा शर्यतींना विरोध करणारी ‘पेटा’ संस्था आणि प्राणिमित्रांवर कारवाई करावी आणि बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता बैलगाडा मालकांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यासोबतचे बैल कोंडवाड्यात नेले. त्यानंतर मालकांना टेबल जामीन देऊन सोडून दिले. मात्र त्यांचे बैल अजूनही कोंडवाड्यात आहेत. यानंतरही बैलगाडा मालक पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे देखील आंदोलनात मंगळवारी सकाळपासून सहभागी झाले होते. त्यांनी बैलगाडा मालकांना पाठिंबा दर्शविला आहे. बैलांचे संगोपन कसे करायचे हे ‘पेटा’ संस्थेने शेतकर्‍यांना शिकवू नये, असा हल्लाबोलही आ. लांडगे यांनी यावेळी केला.

लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार
बैलांची माहिती पुस्तकातून वाचणार्‍या ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बैलांचे संगोपन कसे करायचे हे हाडाच्या शेतकर्‍यांना शिकवू नये. ‘पेटा’ संस्था केवळ कागदी घोडे नाचवित आहे. संस्थेला मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा, आरोप लांडगे यांनी केला. बैलगाडा शर्यतीबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले. या आंदोलनात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अलिबाग, अहमदनगर, पुणे परिसरातून तसेच विदर्भातील शेतकरी सर्जा-राजासह आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने कायदा केला
आ. लांडगे म्हणाले, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने कायदा तयार केला. त्याला राष्ट्रपतींची देखील मान्यता घेतली. परंतु, त्यात पेटा संस्थेने खोडा घातला. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करत आहोत. मात्र ‘पेटा’ वारंवार त्यामध्ये आडकाठी घालत आहे.

बैलांना रस्त्यावर सोडून द्यावे लागेल…
शेतकर्‍यांनी बैलांचा सांभाळ नाही करायचा म्हटल्यावर बैलांना रस्त्यावर सोडून द्यावे लागेल. शेतकरी बैलांचा अत्यंत चांगलेपणाने सांभाळ करत आहोत. पोटच्या मुलासारखे बैलाला सांभाळले जाते. शर्यती सुरू करण्याबाबतचा कायदा तयार केला होता. त्या कायद्यानुसार स्पर्धा चालू व्हाव्यात, अशी आमची मागणी होती. परंतु, त्यात काही संस्थानी आडकाठी घातली. मला विधानसभेत पैलवान आणि बैलगाडा मालक म्हणून ओळखले जाते. याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.