बैलगाडा शर्यतीच्या मागणीसाठी आमदार लांडगे बैलगाडीतून

0

मुंबई – राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी बैलगाडीतून विधानभवनात जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना परवानगी मिळाली नाही आणि त्यांनी भाजपा कार्यालयासमोरच बैलगाडी थांबवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन लांडगे यांच्याकडून बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन स्वीकरले.

गेल्या अनेक वर्षापासून आमदार महेश लांडगे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा चालवला आहे. तामिळनाडूमधील जलीकटटू स्पर्धेला विधानसभेत कायदा संमत करून परवानगी देण्यात आली. तेथील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारने कायद्यात बदल केला. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी लांडगे यांनी लावून धरली आहे.