बैलगाडा शर्यती : लवकरच बैठक घेऊ!

0

मुख्यमंत्र्यांचे दिलीप वळसे-पाटलांना आश्वासन

नागपूर : बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरु होण्यासाठी बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नागपूर येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैलगाडा शर्यतीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांना निवेदनही दिले.

वळसे-पाटलांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचा व परंपरेचा एक भाग म्हणून राज्यातील गावांमध्ये कुलदैवताच्या यात्रा, जत्रा या दिवशी बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात होत्या. बैलांच्या मूळ प्रजाती टिकवून ठेवण्यात बैलगाडा शर्यतीचा महत्वाचा वाटा आहे. शेतकरी पोटाच्या मुलांप्रमाणे बैलांना जीव लावतात. बैलगाडा शर्यती पूर्ववत व्हाव्यात यासाठी विधानसभेने 6 एप्रिल 2017 रोजी विधेयक संमत केले. यासंदर्भात नियमावली प्रसिद्ध करण्याच्या पातळीवर न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे सध्या उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातलेली आहे. शासनाच्यावतीने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बैलगाडा शर्यती सुरु करण्याची ग्रामीण भागातील जनतेची आग्रही मागणी आहे. शासनाच्यावतीने बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरु करण्याबात सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे शासनाची बाजू मांडावी, अशी विनंतीही वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.